एका बंदिशीची गोष्ट - भाग ३

एक डर हैS मोहे साSस ननंदकोS
गंधारानं सजवलेलं तिचं दु:ख तीव्र मध्यमानं धैवतासोबत वाढवत नेऊन दिलंय तार षड्जाच्या हाती आणि त्यानं मागे वळून मध्य निषादाला सोपवलंय, पण निषादाला ते सहन न होऊन त्यानं तार सप्तकातल्या कोमल रिषभाला हाताशी धरत पुन्हा ते तार षड्जाकडे सुपूर्द केलंय! तिच्या त्या दु:खातली तीव्रता, तिचं ते घाबरणं, घुसमटून राहणं केवळ स्वरांतून जाणवतं!
दुजे देरनीSया जेठनीSया सताSवे
या सासू-नणंदेची भीती कमी झाली म्हणून की काय, धाकट्या जावा [देरनिया] आणि मोठ्या जावाही [जेठनिया] त्रास देत राहतात.
या ओळीत मध्य निषादानं आळवलेलं दु:ख तार सप्तकातल्या कोमल रिषभानं तार गंधार आणि मध्य निषादासोबत खो-खो खेळत मध्य धैवत, मध्य निषाद, मध्य सप्तकातला तीव्र मध्यम, मध्य गंधार, मध्य सप्तकातला कोमल रिषभ यांच्या वळणावळणानं जात षड्जाच्या झोळीत घातलंय!
निसदिन कर रही हमरी बाS!
पुन्हा मंद्रातल्या निषादानं मध्यातल्या कोमल रिषभाच्या हातात हात गुंफून, गंधार, तीव्र मध्यम, धैवत, मध्य निषादापर्यंत चढवत नेलेली तिची अगतिक कैफियत तीव्र मध्यमानं मध्य धैवत, गंधार यांच्याशी खो-खो खेळत कोमल रिषभावर आणून पोहोचवली आहे.
धाकट्या तर ठीक आहे, त्यांना काही कळत नाही, पण निदान मोठ्या जावांनी तरी समजून घ्यायला हवंय ना! त्या माझ्याच वाटेनं गेलेल्या असतील ना! पण छे! त्याही [मेल्या!] माझ्याबद्दल कुचुकुचु बोलत राहतात! हे सगळे सगळे भाव त्या सुरावटींनी इतके सुरेख आणि सुरेल मांडले आहेत, की गुंतून जायला होतं त्या बंदिशीत!

ही बंदिश एक बंदिश न राहता, केवळ एका रागाचं रूप जाणून घेण्यासाठी शिकलेली किंवा ऐकलेली रचना न राहता त्या अल्लड वयातल्या त्रासलेल्या पण तरीही उत्साहानं उधाणलेल्या नायिकेची गोष्ट होते! आणि हा सारा त्या स्वरावलीचा खेळ! अतिशय अप्रतिम अशी ही बंदिश इथे ऐकायला मिळेल. ऐका, आणि जाणून घ्या तिची गोष्ट!


(बंदिश गायन दृष्यफीत महाजालावरून साभार.)



लेखिका: क्रान्ति साडेकर

२ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. ठुमरीचें अंतरंग आवडलें

सुधीर कांदळकर

क्रांति म्हणाले...

धन्यवाद सुधीरकाका.