लहानपण देगा देवा - भाग २

त्याच सुमारास आमचे बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला विमानाने जाणार होते. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट केला. मग शेवटी कशीबशी त्यांनी माझी समजूत काढली आणि मी त्यांना माझ्यासाठी दिल्लीहून एक विमान आणायला सांगितलं. नाहीतर मला त्यांच्याबरोबर न्यायलाच पाहिजे. बिच्चारे बाबा! त्यांनी दिल्लीहून येताना  माझ्यासाठी एक छान सेलवर चालणारं विमान आणलं. ते पाहून मी इतकी खूश झाले होते की मी ते विमान सगळ्या घरभर सारखी फिरवत बसायची आणि मग गरम झालं की जरावेळ थांबून पुन्हा फिरवायला सुरुवात. अगदी मी महाविद्यालयात जाईपर्यंत ते विमान आमच्याकडे होतं अगदी सुस्थितीत, फक्त रंग थोडा उडाला होता. मग त्यानंतर ते आमच्या कामवाल्या बाईंच्या नातवंडांना दिलं. खरंतर स्वत:च्या वस्तूंवर माझा प्रचंड जीव. अगदी काही झालं तरी त्या वस्तू अजिबात जागेवरून हाललेल्या सुद्धा चालत नसत. बहुतांशी सगळ्यांचीच ही कथा असते. आईने समजावून सांगितलं की अगं ते इथे नुसतंच पडून राहील, पण कोणाला दिलंस तर त्या मुलाला/मुलीला खेळायला होईल. मला हा मुद्दा पटल्याने ते विमान द्यायला मी तयार झाले. लहान असताना चिंगी म्हणून माझी एक मैत्रीण होती. मी बर्‍याच वेळा तिच्याकडे खेळायला जायचे. मी खूपच लहान असल्याने मला आमच्या आणि त्यांच्या घरात फरक आहे येवढंच दिसायचं पण नक्की काय फरक आहे ते समजायचं नाही. तिच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. त्यामुळे तसे तिच्या अंगावर कपडेपण अगदीच जुने आणि काहीवेळा तर ठिगळ लावलेले असायचे. तशी आमचीही काही अती उत्तम परिस्थिती होती असं नव्हे. पण त्यांच्या तुलनेत खूपच चांगली होती. आम्हाला काही बाहेरचे तयार कपडे विकत घेणे परवडत नसे. पण आमच्या आईला शिवणकाम येत असल्याने ती घरीच आम्हाला छान छान कपडे शिवायची. माझ्याकडचे बरेचसे फ्रॉक्स, माझ्या वाढत्या उंचीमुळे एक वर्षाच्या आत नवीन आणि चांगले असूनही मला लहान होत असत. मग एक दिवस आईने चिंगीला बोलावून माझे जे चांगले फ्रॉक तिला आवडले ते देऊन टाकले. चिंगीने त्यातला पांढरा फ्रीलचा फ्रॉक पटकन घातला आणि टणाटण उड्या मारत घरी तिच्या आईला दाखवायला पळाली. तिचा चेहरा आनंदाने फुलला होता. तो आनंद पाहून मलाही आनंद झाला होता. आता त्या सगळ्यातला गर्भितार्थ लक्षात येतोय. "आपण लहान असताना जितका हळूहळू एकेका गोष्टीत जीव अडकवत जातो तेवढाच आयुष्याच्या एका टप्प्यानंतर हळूहळू एकेका गोष्टीतून जीव सोडवून घ्यायचा असतो". लहानपणी मला माझी झोपायच्यावेळी वापरायची चादर सुद्धा कोणी घेतलेली चालत नसे. आताही चालत नाही पण त्या न चालण्यात एकच फरक आहे, आता मला धुळीची ऍलर्जी असल्याने पांघरूण धूळ विरहित राखण्यासाठी मी ते कुणाला वापरू देत नाही. नाहीतर मला रोज रात्री धुतलेलं पांघरूण शोधत बसावं लागेल. लहानपणी मी धुळीमध्ये प्रचंड खेळायची अगदी धूळ वर हवेत फेकून अंगावर, डोक्यावर सगळीकडे धुळीने माखून घेणे मला आवडत असे. नाहीतर आत्ताची अवस्था एकदम भयंकर होते. लहान असताना आपण केवढे टणक असतो आणि जसं वय वाढतं तशा सगळ्या तक्रारींची सुरुवात होते. सध्याच्या लहान मुलामुलींचे खेळ म्हणजे एकतर टीव्ही पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळणे. आम्ही बाहेर मैदानावर वेगवेगळे मैदानी खेळ खेळायचो तर घरात असताना चक्क रामायणातील छोट्या कथा नाट्यरूपाने खेळायचो. म्हणजे प्रभू रामचंद्र आणि शबरीची भेट. मग आम्ही तिघी असलो तर चौथी व्यक्ती काल्पनिक किंवा आमच्यातलीच कोणीतरी दुहेरी भूमिका करत असे. मी एकटी असतानाचा माझा आवडता टाईमपास म्हणजे पलंगावर आपण बसायचं आणि पलंग म्हणजे बोट आणि फरशी म्हणजे समुद्राचं पाणी अशी कल्पना करून तासनतास कल्पना करायची की आपण समुद्रावरून बोटीत बसून फिरतोय. मग वादळ येतं, समुद्राचं पाणी उसळतंय.....गंमत म्हणजे मी तोपर्यंत समुद्र पाहिलेला नव्हता. सगळ्याच कल्पना. आता मी इतक्या गोष्टी पाहून सुद्धा अशा सुंदर कल्पना डोक्यात येणार नाहीत. मला लहान मुलांचा खूप हेवा वाटतो. मी असं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय की वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत लहान मुलांच्या डोक्यात जे काही ग्रहण केलं  जातं त्यावरच त्या मुलाची पुढची क्षमता अवलंबून असते. म्हणून आजकाल बर्‍याच मुलांना ६ वर्षे वयाच्या आत प्रयत्नपूर्वक अनेक गोष्टींचं ज्ञान देण्याचा प्रयत्न चालतो. सध्याच्या लहान मुलांचे विविध क्लास प्रकरण पाहिलं की मनात धडकीच भरते. लहानपणी आम्ही तिघी बहिणी एका क्लासला जात असू. एका गुरुजींकडे आम्ही भगवद्गीता शिकायला जायचो. मी जेमतेम पाच वर्षांची असेन आणि माझ्या बहिणी आठ वर्षांच्या. त्यावेळी माझे भगवद्गीतेचे अठरा अध्याय व्यवस्थित उच्चारांसहित तोंडपाठ होते. आता तोंडपाठ नाहीत. पण वाचायला बसले तर शब्दोच्चार अडखळत नाहीत आणि लय आपोआप बाहेर पडते. काय गंमत असते नाही. माझं सोलापुरात गेलेलं लहानपण माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम असा काळ होता की जो मी कधीच विसरू शकत नाही. म्हणूनच राहून राहून पुन्हा त्याच ओळी ओठांवर रेंगाळतात........लहानपण देगा देवा....॥




लेखिका: अपर्णा लळिंगकर

४ टिप्पण्या:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा ठकीबाई वा! सोलापूरचा समुद्र मीच लपवून ठेवला आहे बरं का.

बोट पण आवडली.

सुधीर कांदळकर

Meenal Gadre. म्हणाले...

छोट्या छोट्या प्रसंगांचे वर्णन करून लहानपण मस्त उभे केले आहे.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह ताई..खरच खूप लहान लहान गोष्टी असतात पण आपल्याला त्या इतका लळा लावून जातात की काय सांगू :)

मला बदक नाव खूप आवडल.. :)

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

किती छान बालपण तुम्हाला लाभलं. हेवाच वाटला क्षणभर. पण मग जानवलं की आपलंहि बालपण गमतीदार होतंच कीं!