इनटॉलरेबल क्रुएल्टी...चित्रपट परिचय!

अमेरिकेत एक चावट विनोद प्रसिद्ध आहे.........

प्रश्न: व्हाय आर मोस्ट हरिकेन्स नेम्ड आफ्टर वुमेन?
उत्तरः व्हेन दे कम, दे आर वाईल्ड अ‍ॅंड वेट;अ‍ॅंड व्हेन दे गो,दे टेक युवर हाऊस अ‍ॅंड कार.

आता यातला द्वैअर्थी भाग माफ केला तरी वरचं वाक्य शंभर टक्के खरं आहे. लग्न हा एक करार असतो असं आपण म्हणतो, पण अंकल सॅमच्या देशात ते शब्दशः अंमलात आणलं जातं आणि याचंच प्रतिबिंब हॉलिवुडच्या असंख्य चित्रपटांत आपल्याला अनेकदा दिसतं. प्रिनुप्टिकल अ‍ॅग्रीमेंट उर्फ प्री-नप म्हणजेच विवाहेच्छूक जोडप्याने(!!) लग्नाआधी केलेला एक कायदेशीर करार. या करारात असणारी कलमं, अटी वगैरे गोष्टी प्रत्येक करारागणिक बदलत असल्या, तरी प्रामुख्याने त्यात घटस्फोट झाल्यास स्थावर व जंगम मालमत्तेची वाटणी आणि पोटगी यासंदर्भात सविस्तर विवेचन केलेलं असतं.

हा करार करण्याचं प्रमाण प्रचंड वाढण्याचं - आणि मग ओघाने त्या संदर्भात अनेक वकिलांची या विषयात 'सुपर स्पेशालिटी' तयार होण्याचं - कारण असं की अशा कराराअभावी जर घटस्फोट झाला (आणि विशेषतः जोडप्यापैकी श्रीमंत पार्टीचे म्हणजेच बहुतेक वेळा नवर्‍याचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले), तर नवर्‍याच्या मालमत्तेला साधारण पन्नास टक्के हिस्सा बायकोला मिळतो. तो हिस्सा इतका मोठा असू शकतो की आंधळ्या प्रेमापोटी किंवा निव्वळ हलगर्जीपणामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करुन अनेक नवरोबा स्वतःचे सर्वस्व गमावतात, तर काहींवर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ येते. लेखाच्या सुरवातीला मी जो विनोद सांगितला त्याला ह्याच कायदेशीर धुलाईचा संदर्भ आहे.

घटस्फोट म्हटलं की नवरा-बायकोची दुखावलेली मनं, मुलांचं उध्वस्त झालेलं भावविश्व, एक मोडलेलं घर, अशा असंख्य गोष्टी आपल्या (म्हणजे निदान माझ्या तरी भाबड्या भारतीय) मनात येतात. अमेरिकेला मात्र ही गोष्ट नवीन नाही. तिथे हे सर्रास चालतं (आता इथेही ते 'सर्रास' या पातळीवर होऊ लागलंय म्हणा...असो). पण म्हणतात ना, अती झालं आणि हसू आलं. अमेरिकेतली ढासळलेली विवाहसंस्था व विचित्र कौटुंबिक कायदे आणि त्यांचा संधीसाधू वकिलांच्या (ही द्विरुक्ती आहे!!) सहाय्याने पदोपदी घेतला जाणारा गैरफायदा यांच्यावर उत्तम मार्मिक भाष्य करणारा आणि त्याबरोबरच खो खो हसवणारा कोएन बंधूंचा 'इनटॉलरेबल क्रुएल्टी' हा चित्रपट हा या लेखाचा विषय.
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.