एका बंदिशीची गोष्ट - भाग २

ही अप्रतिम बंदिश आहे पूरिया रागातली. सायंकाळच्या कातरवेळेत गायला जाणारा मारवा थाटातला हा सायंकालीन संधिप्रकाशी राग. [अलीकडे तो रात्रीच्या प्रथम प्रहरातही गायला जातो.] कोमल रिषभ, तीव्र मध्यम आणि पंचम वर्जित असलेला हा अतिशय सुरेख राग. या रागातली "मैं कर आई पियासंग रंगरलियां" ही ती सुरेख आणि सुरेल बंदिश! ही बंदिश मी ऐकली ती पंपरितोष पोहनकरजी यांच्या आवाजात. त्याच वेळी ती मला अत्यंत भावली होती. आणि नेमकी शिकतानाही तीच माझ्या पुढ्यात उभी! जन्माचं सार्थक म्हणतात, ते हेच असावं का?

अवघ्या पाच ओळींत त्या नायिकेच्या किती भावनांचं इंद्रधनू गुंफलं आहे स्वरांनी! ही बंदिश शिकत असताना अक्षरश: त्या नायिकेच्या भूमिकेत स्वत:ला ठेवावं, इतकं एकरूप केलं त्या भावना, शब्द आणि स्वरांनी!

मैं कर आई पियासंग रंगरलियां
आलि जात पनघट की बाट ॥
स्थायीमधल्या या दोन ओळींत तिचा खट्याळ, लाजरा, हसरा चेहरा दिसतो!

मैंS कर आई पियासंग रंगरलियाSSS
मंद्र निषादापासून सुरू होणारी, षड्ज, तीव्र मध्यम, गंधार, कोमल रिषभ यांच्या साथीनं पुन्हा षड्जावरून खाली उतरत मंद्र धैवत, मंद्र निषाद, षड्ज, कोमल रिषभ अशी वर चढत मध्य षड्जावर संपणारी पहिली ओळ त्या सखीला जणू सांगतेय, की घरच्या सगळ्या कटकटी विसरून, सासू-नणंद, जावा सगळ्यांच्या नाकावर टिच्चून मी पियाशी रंगरलियां, चेष्टामस्करी, शृंगार करून आले, तो कुठे? तर
Sलि जाSत पनघट की बाS!
पाणी भरायच्या निमित्तानं पाणवठ्यावर जाता जाता सख्यानं मला घेरलं! मंद्र निषादावरून कोमल रिषभाचा हात धरून गंधार, तीव्र मध्यम अशा पायर्‍यांवरून वर चढत चढत मध्य निषादाला स्पर्शून गंधार आणि तीव्र मध्यमासोबत धैवताच्या भोज्याला शिवून पुन्हा कोमल रिषभावर उतरणारी ही दुसरी ओळ या लाजर्‍या न् साजर्‍या मुखड्याचा आरसाच आहे जणू! काय सुख मिळालं असेल तिला त्या अवघ्या काही क्षणांच्या भेटीत? पण तरीही ती इतकी खुललेली, फुललेली आहे की जसं अख्खं आयुष्य जगलीय त्या क्षणांत!

आता यात कसलं आलंय कौतुक? पाणवठ्याच्या वाटेवर पियाशी रंगरलियां करण्यात काय विशेष? याचं उत्तर दिलंय अंतर्‍यात!

एक डर है मोहे सास-ननंदको,
दुजे देरनिया-जेठनिया सतावे,
निसदिन कर रही हमरी बात!
हे आहे तिचं दु:, तिची व्यथा! आणि म्हणून तिला पियाला भेटण्यासाठी पाणवठ्याच्या वाटेचा सहारा घ्यावा लागलाय!!


प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.