कुठल्याही हिवाळी/दिवाळी इत्यादी इत्यादी इ-अंकांसाठी लिहायचं म्हटलं की माझ्या अंगात एकदम प्रचंड उत्साह संचारतो... किती आणि काय लिहू असं होऊन जातं... नवनवीन कल्पना सुचायला लागतात.. नवनवीन विचार मनात घोळायला लागतात.. नवीन लेख, नवीन विषय, नवीन कविता, नवीन कल्पना वगैरे वगैरे माझ्या डोक्यात अक्षरशः फेर धरून का कायसंसं म्हणतात तशा नाचायला लागतात. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं अगदी. मी बरंच कायकाय मस्त लिहायचं ठरवायला लागतो. काही लेख, कथा, कविता मनातल्या मनात वगैरे तयारही होऊन जातात, रात्री झोपताना कित्येक कल्पना नव्याने सुचतात. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर त्या सगळ्या कल्पना फक्त कागदावर उतरवल्या की झाला लेख तयार.. अहाहा.. कस्सलं सही.. !!
दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर मी मोठ्या उत्साहाने लिहायला बसतो. काल सुचलेलं सगळं लिहून टाकायचं एकदाचं असं ठरवून झरझर लिहायला लागतो.
.
.
..
.
.
ए फॉSSर?
आप्प
बी फॉSSर?
बे
सी फॉSSर?
के
डी फॉSSर?
दाद
.
..
.
.
...
.
.
..
.
जानेवारी
दानॅनॅनॅ
फेब्रुवारी
पेमॅमॅमॅ
मार्च
माSS
.
.
..
...
.
चैत्र
तैत्त
वैशाख
बात्ता
ज्येष्ठ
देत्त
.
.
.
..
..
.
वन
तू SS
अरे वन म्हण ना वन
तू SS
बरं तू तर तू... माझं पांढरं निशाण !
थ्री SS
ती SS
फोर SS
पो SS
.
.
.
..
...
.
..
लिहिता लिहिता आणि लिहून झालेलं वाचल्यावर माझं मलाच नीट कळत नाही की मी काय लिहिण्याचा विचार केला होता, काय विचार करत होतो, काय काय सुचलं होतं, काय लिहायचं होतं आणि मी काय लिहिलं आहे. मग अचानक नळी (ट्यूब व्हो !) पेटते. झोपायच्या आधी सुचलेल्या कल्पना आणि प्रत्यक्ष झोपायला जाणं याच्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं. लेकाला झोपवताना त्याचा अभ्यास घेण्याच्या नावाखाली आम्ही बरंच काय काय बडबडलेलो असतो.
रात्री झोपताना लिहिलेलं/वाचलेलं (आणि बोललेलंही) सकाळी उठल्यावर चांगलं लक्षात राहतं अशा आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या !
लेखक: हेरंब ओक
२ टिप्पण्या:
हे हे किती क्यूट :) मस्तच हेरंब..खूप खूप आवडल.
:D .. आभार्स सुहास ..
टिप्पणी पोस्ट करा