गळ्यात एक कसलासा जुना झालेला खड्यांचा खोटा नेकलेस, हातात डझनभर बांगड्या, दोन घट्ट वेण्या, कपाळावर, गालावर गोंदणाच्या हिरव्या खुणा, फिका जांभळा ढगळ असा पंजाबी ड्रेस आणि एक खडूस गावंढळ, अविश्वास आणि नवखेपणाही... अशा अनेक भावनांचे संमिश्रण असलेला, खाली मान घातलेला चेहरा... अशी एक मुलगी माझ्यासमोर आणून गुलाबने, माझ्या मैत्रिणीने म्हटले, "सुटले बाई तुला दिलेल्या प्रॉमिसमधून! आता ही मुलगी आणि तू, तुम्ही दोघी काय वाट्टेल ते करा. "
मी गुलाबला, अगं बस तरी, थॅंक्यु किंवा त्या मुलीबद्दल अधिक काही विचारायच्या आत ती शेवटच्या पायरीवर पोहोचली सुद्धा! ही गुलाब म्हणजे पवनपुत्राची बहीणच जणू... वार्यासारखी पळत असते. सगळ्यांची सगळी कामे करते त्यामुळे तिला वेळ कसा तो नसतोच.
माझ्या लेकीचे लग्न झाल्यानंतर मला एकटीलाच राहणे जमणारे नव्हतं म्हणून मला कंपॅनियन कम असिस्टंट कम बरंच काही अशी एक व्यक्ती चोवीस तास माझ्याबरोबर राहील अशी पाहिजे होती आणि गुलाबने आणलेली ही व्यक्ती तर सगळंच कम होतं अशी होती. ही कमी दूर कशी करायची? हे मला जमेल काय? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले पण आता काय करणार? आलिया भोगासी असावे सादर... असे मनाला बजावूनच तिला विचारलं, "नाव काय गं तुझं? "
दुसर्या दिवसापासूनच माझं आणि लताचं को-लाईफ सुरू झालं. सकाळचे ६ वाजले असतील तोच हिची खुडबूड सुरू झाली. पण मी पडले सूर्यवंशी, त्यातून आज रविवार म्हणजे सुटीचा दिवस तेव्हा तिला जरा दटावूनच झोपायला लावले.
छबिलदास कन्या शाळेत तिची अॅडमिशन घेतली. मी ऑफिसमध्ये आणि ती शाळेत जाऊ लागली. शाळेत जाण्यापूर्वी व आल्यानंतर स्वयंपाकघरातील मदत, केरवारा, स्वच्छता करता करता अनेक गोष्टी म्हणजे सुंदर फुलके करणे, छान बारीक भाजी चिरणे, बाजारहाट करणे इत्यादी आत्मसात करत गेली. आठवी, नववी आणि दहावी झाली आणि आता मी पुढे शिकणार नाही असे तिने निक्षून सांगितले. आजकाल ग्रॅज्युएट्स होऊनही नोकर्या कुठे मिळतात? कशाला उगीच तुला खर्च असा युक्तिवाद करून मला निरुत्तर केले.
मग तिला झारापकर टेलरिंग कॉलेजमध्ये घातले. पोरीच्या हातातच कौशल्य होते... छान शिवू लागली. बॅंकेचे व्यवहार, टेलिफोनचे बील, लाइटचे बील भरणे, अगदी फोनवरून हॉटेलमधले घरी मागवणे इत्यादी सर्वच कामं अगदी बिनबोभाट होऊ लागली.
तोपर्यंत नातू जन्माला आला. मोठा होऊ लागला... ही त्याचेही प्रेमाने सर्व करू लागली. म्हणता म्हणता पाच-सहा वर्षे कशी निघून गेली कळलंच नाही. गावंढळ लताची फुलराणी झाली. बोलता बोलता ती मला ’आई’ म्हणून हाक मारू लागली. लेकीला आणि नातवाला आश्चर्य वाटलं... जय, माझा नातू लहान आहे, त्याने लताला विचारलं, "ती काय तुझी आई आहेऽऽऽ? ती फक्त माझी आई आहे. "
लता म्हणाली, "हो तर, ही माझी पण आईच आहे.
"जय, आजीने दत्तक घेतलं लताला तर तुझी आणि माझी पंचाईत होईल रे बाबा! "
मग आपण काय करायचं? "... लेकीने जयची गंमत केली.
मी म्हटलं... तुम्ही दोघंही वात्रटच आहात. तुमचं आपलं काहीतरीच.
१ | २ |
---|
प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.