कडू गुपित

एखादा चित्रपट महोत्सव झाला आणि त्याबद्दल पेपरात वाचलं की मग मी मनाशी एक कुठलीही भाषा धरतो आणि त्या भाषेतल्या सिनेमांबद्दल नेटवर माहिती शोधतो. मग त्यातून अनेकदा हाताला रत्नं लागतात. वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या संस्कृतींची निदान एक तोंडओळख होते. आणि माणूस ह्या प्राण्याची सुखदुःख वरकरणी कितीही वेगवेगळी वाटली तरी एका समान वैश्विक धाग्यानं एकमेकांत गुंफली गेल्याचं सत्य वारंवार मनात गडद होत जातं. सापडलेला/ले सिनेमे मिळवून बघणं म्हणजे खरी गंमत. तो मिळून पाहेस्तोवर त्याबद्दल जास्त वाचणं टाळायचं वगैरे, एकदम माहौल बनवायचा. पण सिनेमा सहज मिळणारा नसला तर मग अजून मजा. जंग जंग पछाडून, नेटाने नेटावर शोधून तो सिनेमा मिळवणं आणि मग तो बघणं, ह्यात मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आणि चांगला सिनेमा अनुभवल्याचा आनंद असा दुहेरी फायदा होतो.

ह्या सगळ्या उपक्रमांतून आजवर खूप सिनेमे अनुभवलेत, ह्यापुढेही अनुभवेन. अगदी कोरियन, जपानीपासून ते पॅलेस्टिनियन, तुर्की आणि फिनलँड, स्वीडन पासून ते नॉर्वेजियन पर्यंत अनेकानेक सिनेमांचा आनंद केवळ इंटरनेटच्या कृपेमुळे घ्यायला मिळाला. २००२ सालच्या ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित, अल पचिनो अभिनित इन्सॉम्निया चा ओरिजिनल सिनेमा म्हणजे १९९७ सालचा नॉर्वेजियन इन्सॉम्निया मिळवण्यासाठी मी तब्बल दोन आठवडे तडफडलो होतो. पण मिळाल्यानंतर पाहताना जे समाधान लाभलं, त्याला तोड नाही. ह्या चित्रविचित्र भाषांचे सिनेमे सबटायटल्ससकट पाहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की मी अगदी मराठी सिनेमा पाहत असलो तरी खाली सबटायटल्स आली तर नजर तिथेच जाते.
आणि असाच एक दिवस मी मनाशी धरला सर्बिया आणि सिनेमा शोधता शोधता हाताशी लागला बोस्नियन सिनेमा - गर्बावित्सा (Grbavica). उच्चार नक्की असाच नसला तरी जवळपास जाणारा आहे. बोस्नियन राजधानी सारायेव्हो (Sarajevo) चं एक छोटं उपनगर 'गर्बावित्सा' मध्ये घडणारी एक छोटीशीच, पण उद्विग्न करणारी कहाणी म्हणजे हा सिनेमा.
पुढे सिनेमाच्या कथेतलं छोटंसं रहस्यदेखील सांगण्यात आलेलं आहे ह्याची मी आधीच कल्पना देऊन ठेवतो.
ही गोष्ट घडते ती युद्धोत्तर बोस्नियामध्ये. १९९२ सालच्या जवळपास बोस्नियाक आणि सर्ब लोकांमध्ये घडलेल्या युद्धाची सुन्न करणारी अदृश्य पार्श्वभूमी ह्या सिनेमात आहे. सिंगल मदर एस्मा जमेल ते आणि पडेल ते काम करून आपल्या १२ वर्षांच्या मुलीला साराला वाढवतेय. अधुनमधुन ती सपोर्ट ग्रुप्समध्येही जाते. परिस्थितीनं गांजलेली, थकलेली आणि हतबल अशी वाटणारी एस्मा सारासाठी मात्र आपली सगळी ताकद एकवटून उभी आहे. १२ वर्षांची सारा कुठल्याही नॉर्मल १२ वर्षीय मुलीसारखी उत्स्फूर्त, खेळकर आणि मोकळं आयुष्य जगतेय. एस्मा तिला गरजेचं असं काही कमी पडू देत नाही. आणि मग एक दिवस साराच्या शाळेची ट्रीप निघण्याची सूचना येते.
ट्रीपची फी भरा किंवा ज्या मुलांचे वडील बोस्नियाक-सर्ब युद्धात (सिनेमामध्ये जाणून बुजून 'सर्ब' शब्दाऐवजी 'चेटनिक' हा स्लँग शब्द वापरलाय) शहीद झालेत अशांना सर्टिफिकेट दाखवून फुकट ट्रीप, अशी सूचना शाळा काढते. साराला लहानपणापासून आईनं हेच सांगितलंय की तुझे वडील चेटनिक्स शी लढताना शहीद झालेत. त्यामुळे शाळेतही मिरवून आणि मित्र समीरला सांगून की तुझ्या वडलांप्रमाणेच माझे वडीलही शहीद झाले होते, सारा घरी येते आणि आईकडे वडलांच्या हौतात्म्याचं सर्टिफिकेट मागते. एस्माचं छोटंसं जग हादरतं. पूर्वीपासूनच वडलांच्या ओळखीबद्दल सारवासारव करणारी एस्मा आता मात्र भांबावून जाते आणि तिचं ते भांबावून जाणं साराच्याही नजरेतून सुटत नाही.

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.