काळरात्र !

रोजच्यासारखाच दिवस वाटत होता तो. पावसाची धार सकाळ पासूनच सुरू होती. पावसापासून स्वत:ला वाचवत वरळीला ऑफिसला पोहचलो.

सकाळीच सगळं काम आटपून घेतलं. दुपारी कॅंटिनमध्ये जेवण करून आलो आणि ऑनलाईन बातम्या वाचायला घेतल्या. वाचताना कळलं की पावसाचा जोर वाढतो आहे. लागलीच आईला फोन करून काळजी घ्यायला सांगितलं. माझ्या खडूस बॉसला तोपर्यंत पावसाची बातमी कळली होती. त्याने ४ वाजता जायला परवानगी दिली. त्यादिवशी काय झाले माहीत नाही पण बॉसने आम्हा दोघांसाठी चिकन सॅंडविच मागवले.
खडूस बॉसकडून कधी का होईना पण खिसा ढिला झाला या आनंदात ते दोन मिनिटात पोटात गडप झाले.

चार वाजता मी आणि माझा सहकारी ऑफिसच्या बाहेर पडलो. पाहतो तर बाहेर तुफान पाऊस पडतोय आणि रस्त्यांचे झरे झाले आहेत. दादरला ट्रेन मिळेल या आशेने एका हातात छत्री आणि एका हाताने बॅग सांभाळत दादरसाठी बस पकडायला म्हणून बसस्टॉपवर गेलो पण अर्धा तास वाट पाहूनही बसचा पत्ताच नव्हता. मग म्हटलं चला टॅक्सी करू, तर त्या दिवशी टॅक्सी मिळेल तर शपथ. शेवटी चालत चालत आम्ही दोघांनी दादर गाठले. सिद्धिविनायकाला नमस्कार करून पुढे निघालो तोच नुकताच हौसेने घेतलेल्या नव्या मोबाईलवर भावाचा फोन. सेंट्रल लाइन कोलमडली आहे. ट्रेन ठप्प. त्याला कळवलं की मी घाटकोपरला बसने आतेभावाकडे जातो. कबुतरखान्याजवळ घाटकोपरला जाणारी आणि खचाखच भरलेली बस दिसली. म्हटलं प्रयत्न करून पाहू शिरता येतं का ते. शेवटच्या पायरीवर एक पाय बसवला आणि भिजत लोंबकळत प्रवास सुरू केला.

कसंतरी करून आत शिरलो आणि दरवाज्याशेजारील सिटजवळ उभा राहिलो. त्या बसला अर्धा कि.मी. जायला दीड तास लागला. एव्हाना बसमध्ये गप्पा सुरू झाल्या होत्या. त्या शेजारील सिटवर एक मुलगा आणि एक मुलगी बसलेले होते. दिसायला कॉलेजकुमारच. त्यांच्यासोबत बोलणं सुरूच होतं. आजचा पाऊस, मुंबईची गर्दी, प्रदूषण, ट्रॅफिकजॅम अश्या चोथा झालेल्या विषयांवर गप्पा चालू होत्या. त्यांनाही घाटकोपरलाच जायचंय हे एव्हाना मला समजलं होत. सात वाजपर्यंत आम्ही त्या बसमध्ये वाट पाहत बसलो होतो की बस थोडीतरी पुढे सरकेल म्हणून पण कसलं काय. शेवटी आम्हा तिघांमध्ये ठरलं की तिघांनी मिळून टॅक्सी करून घाटकोपर गाठायचं. आम्ही छ्त्र्या उघडून बसमधून उतरलो. समोरचा रस्ता पूर्णं ट्रॅफिकमध्ये जॅम होता. तरी कोण जाणे आम्ही आशाळभुतपणे एक एक टॅक्सीवाल्याला विचारू लागलो.

“जाणार ना घाटकोपरला, पण टॅक्सी डोक्यावर घ्यावी लागेल. अरे इतका ट्रॅफिक आहे कशी नेणार टॅक्सी. २ किलोमीटर पर्यंत ही रांग आहे.”
असं एकाने म्हटल्यावर पुन्हा डोकी खाजवू लागलो. त्यालाच विचारलं “ मग इथून घाटकोपर चालत किती लांब आहे”

प्रतिक्रिया देण्याकरता कृपया शेवटच्या पानावर जा.